सासवड या गावात म. ए. सो वाघीरे हायस्कूल ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची शाळा २६ मार्च १९०६ रोजी सुरू झाली.
शाळेत इ. ५ वी मध्ये येणारे सर्व विद्यार्थी बाहेरच्या गावातील किंवा नगरपालिकेच्या शाळेतून येत असत, परंतु बऱ्याच गावांमध्ये माध्यमिक शाळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आपल्या वाघीरे हायस्कूलमध्ये विद्यार्थी संख्या अपुरी पडत होती. आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेतील शाळेत नुसते पुस्तकी शिक्षण न मिळता संस्काराचेही शिक्षण आपल्या पाल्याला अगदी लहानपणापासून मिळते असे अनेकांना जाणवले. म्हणून १९८५ म.ए.सो वाघीरे हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. कि. भा . बळी तसेच उपमुख्याध्यापिका मा.सौ कमल प्रभुणे व मा. मारणे सर यांच्या पुढाकाराने जुलै १९८५ मध्ये बालवाडीची स्थापना झाली .
११ जून १९८६ रोजी प्राथमिक विभाग सुरू झाला. त्यानंतर इ.१ली व २री च्या वर्गास दिनांक २६/८/१९८७ रोजी शासन मान्यता मिळाली.
संघर्षाचा कालखंड (असल्यास), त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न केलेल्या उपाययोजना, संस्था, बाह्य व्यक्ती किंवा संस्थांची मदत झाली असल्यास त्यांची माहिती :
जून १९८६ इ. १ली चा वर्ग सुरु झाला. या वर्गास व इ.२रीच्या वर्गास १९८७ ला शासनमान्यता मिळाली. त्यानंतर इ. ३ री च्या वर्गास १९८८ ला मान्यता मिळाली. १९८९ ला इ.४थीच्या वर्गास शासनाकडून लवकर मान्यता मिळाली नाही. सासवड नगरपालिका शिक्षण मंडळाची शिफारस मिळणेसाठी संस्था, शाळा यांनी बरेच प्रयत्न केले. वारंवार ओळखीच्या नगरसेवकांच्या भेटी घेणे, प्रशासन अधिकारी यांचेकडे वारंवार जाते, पत्र देऊन पाठपुरावा करणे अशा गोष्टींमध्ये जवळपास ३ वर्षांचा कालावधी गेला. अखेर या प्रयत्नांना यश आले. मा. प्रशासन अधिकारी सा. न. पा. यांचे जुलै १९९३ च्या पत्रानुसार इ.४थीच्या वर्गास जून १९९२ पासून मान्यता मिळाली.
इ. १ली ते ४ थी सलग मान्यता मिळाल्यानंतर शाळेत १००% अनुदान मिळणे आवश्यक होते. हे अनुदान मिळण्यासाठीही संस्था व शाळेस बरीच खटपट करावी लागली व शाळा सन १९९९ – २००० या वर्षापासून १००% अनुदान प्राप्त झाले. शासन अनुदान मिळण्यास बराच विलंब झाल्यामुळे शाळेतील शिक्षकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.
शाळेस मान्यता मिळण्यासाठी सासवड न.पा.शिक्षण मंडळाचे तत्कालीन सभापती मा. राजेंद्र टिळेकर तसेच उपसभापती . सौ.जयश्री कुलकर्णी हे शाळेचे पालक असल्यामुळे तसेच प्रशासन अधिकारी मा. श्री. येळे यांची,शाळेचे कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी यांचीही शाळेस खूप मदत झाली.
