शाळेची माहिती

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्गसुंदर पुरंदर तालुक्यातील नावाजलेली उपक्रमशील शाळा म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना ११ जून १९८६ साली झाली. सन २०१०-११ हे रौप्यमहोत्सवी वर्ष, या वर्षांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले. ११ जून १९८६ ते आजपर्यंत शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय प्रगतीचा आढावा थोडक्यात घेत आहे .

बदलत्या काळानुरूप शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना केली. पहिल्यापासूनच या शाळेतील विद्यार्थ्यांतील शिस्त व शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ,तसेच शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरू असलेली धडपड , विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये असलेले विश्वासाचे आणि एकमेकांबद्दल सहानुभूती ठेवणा नाते यामुळे गेल्या सदतीस वर्षांपासून आजपर्यंत सर्वांचा ओढा या शाळेकडे आहे. सुरुवातीला शाळेमध्ये ४७ विद्यार्थी होते.आज ६४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी लावलेले या रोपटयाचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे. त्यावेळी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी मिळून तीनच जण होते. जसजशी विद्यार्थी संख्या वाढू लागली तशी शिक्षक संख्येतही वाढ झाली. सुरुवातीला मारणे सर संपूर्ण शाळेचे प्रशासनाचे काम पाहत होते. त्यामुळे शाळेची प्रगती झपाट्याने वाढू लागली. सौ. चपकेबाई , सौ. दातेबाई , सौ. कापरे बाई, सौ.जगताप बाई इत्यादी शिक्षिका होत्या. सेविका म्हणून आशा अत्रे व सेवक कै.सूर्यकान्त पवार तसेच लेखनिक म्हणून एल. डी. देशपांडे व गौरी प्रभुणे यांनी काम पाहिले. मारणे सर , गोसावी सर, काकडे सर, बळी सर, मायभटे बाई, खिलारे सर,चिंबळकर बाई, उज्ज्वला गायकवाड,प्रतिभा गायकवाड अशा मुख्याध्यापकांचे समर्थ नेतृत्व लाभल्यामुळे शाळेच्या लौकिकात भर पडत गेली. आजही उत्साही, सहकार्य करणारे, उपक्रमात सहभागी होणारे, शाळेबद्दल आस्था आत्मीयता असणारा पालक वर्ग शाळेला लाभलेला आहे.

शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.त्यांचे नेतृत्व पाहताना ,ऐकताना मन आनंदाने, अभिमानाने भरून येते. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी, चेहरामोहरा बदलण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. शाळेवरील असलेले प्रेम, जिव्हाळा, शिक्षकांबद्दल आदरभाव असाच वृद्धिंगत होत राहावा.  शाळेचा नावलौकिक असाच खुलत राहावा व शाळा मातेकडून असेच या पुढेही देशाचे सृजन , कर्तुत्ववान सक्षम नागरिक घडविण्यासाठी आणि शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

Scroll to Top